का असतो आपण मनाने एवढे असमाधानी, गोंधळलेले, असावध, भित्राट? का इतके दुःखी असतो? कशाची काळजी? इतरांच्या विचारांना खरच मानतो आपण? देतो आवश्यक ते लक्ष? करतो सगळ त्यांच्या विचारांनी? का एवढे मदतीचे हात पाहिजे असतात?
हात कसले मागतो आपण, काम करून हवे असते. मन संभाळून पाहिजे असते. दुःख सारवणारे शब्दच हवे असतात. खरं म्हणजे आतून जागं करून पाहिजे असतं. कोणीतरी येऊन दटावल, कानउघडणी केली, उकल करून दाखवली, पुढचा पाऊल घेण्याचा उत्साह भरला की मन सुरक्षित होत, प्रफुल्लित होत. निर्धास्त मार्गस्थ होतो मग आपण.
अनेकदा हवा असतो असा विश्वास वाढविणारा पण निशब्द वावर. तर कधी आपल्याला अनामीकाप्रमाणे बोट धरून मी आहे ना असेच जाणवून देणारा. कधी कणखरपणे स्पष्टवक्तपणा दाखवुन जाणारा. आपल्याला पाहिजे असतो बिनशर्त पाठिंबा. नाही जाणवला तर आपण मनाला लावून घेतो, रागावल्याची भावना घेतो. झुगारून टाकतो तो आश्वासक वावर. विसरतो की मुळात तो होताच आपल्यासाठी.
ते मात्र निष्पापपणे तेथेच. आपल्याच अंगणात. हाक मारायचा अवकाश की नेमकी मदत घेऊन हजर. कसे जमते हे झटणे? स्वतःच्या आयुष्यात काय यांना सगळे ताट मांडून मिळते? असणारच. देव बहुधा यांच्या सगळ्या काळज्या, गरजा स्वतःच निपटून याना रिकामे ठेवत असावा. नाहीतर कसे हे दत्त म्हणून आपल्यासाठी उभे? खरेतर सारखे आपण गराड्यात पाहतो याना. थकत नसतील? आपल्याआधी कोण कोण यांच्या भोवती? आणि आपल्यानंतर? कमाल आहे यांची. आंधळेच असावेत. त्यानच्या कठीण प्रसंगी कोण उभं असत? कळले आपल्याला आजवर? झोकून देऊ आपण त्यांच्या अगतिकतेसाठी कधी? नाहीच बहुधा. वरवर म्हणू. तात्पुरती फुंकर मारू. आणि गृहीत धरू की मारलेली फुंकर त्यांचात आपल्याचबाबतचा वाऱ्याचा झोत तेवत ठेवो. आपल्यालाच लागणार त्यांची सोबत. गरजच असते ती आपली. त्यानना समजत नाही हे किती बरे!? येणारच पुन्हा ते आपल्या शिळेला उत्तर दयायला.
करामत करून जातात असे लोक... जे कार्य, निर्णय आपण अशक्यप्राय समजून असतो ते सोपे करतात - आपल्याचसाठी. अर्थात, आपली धारणा करून देतात - आलबेल असल्याची.
पण का होते आपली तशी धारणा? त्यांचा अनुभव खरच एवढा गाढा असतो की आपल्यातच असते सुप्त शक्ती जी ते जागवतात की अजुन दुसरे काही?
सकारात्मक जगण्याची रीत, रूढी झुगारून पुढे सारण्याची इच्छा, त्रासाला सामोरे जाण्याच धाडस - प्रतीत करतात ते.
खुबीच असते त्यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा जाणवुन देण्याची. रीता नसतो तो पाठिंबा. त्यामागे अथांग अनुभव, जीवनाचे कडू आणि कठीण प्रसंगातून सुलगून निवलेले मन असते. स्वतःच कष्टाने उभारलेले विश्व. सभोवतालचा सौहार्दाचा माहोल. मोठया मुश्किलीने कमावलेला असतो तो. जिगरीने जगण्याचा ध्यास. आपली वर्तुळ सांभाळून नवीन वर्तुळांचा स्वीकार करणारे मन. स्वच्छ, खळखळाट करणार पाणी उंचावरून खालवर पोहोचतय ना याच्यावर करडी नजर ठेवणारी वृत्ती. भोवती प्रासंगिक धैर्य, निर्णयक्षमता निर्माण व्हावी अशी अगतिक ओढ त्यांच्यात असते. फक्त त्यांची कृती बघावी. गवगवा नाही करणार ते. कधीही दूरदृष्टी नजरेआड नाही. म्हणूनच आपल्या आजूबाजूला कायम प्रगतशील वृत्ती शोधून त्यात उत्साह भरवणारी नेकीं कोणाला स्वविकासला प्रवृत्त करणार नाही? इछचाशक्ती असली पाहिजे आपल्यातच. कुठला रस्ता? सरळ की वळणाचा? कळल पाहिजे. बघितलं पाहिजे. प्रसारण तर चालूच. तेथेही ट्यून होता आले तर ठीक. जोड मिळाली तर...
अशी लोकं आपल्या आजूबाजूला नेहमी वावरत असतात. ती लोकं, संयुक्तिक वृत्ती शोधत असतात, धडपडणारी मनं, मायेसाठी आसुसलेल्या म्या पमरांचं असणं. शोधही कसा? भिरभिरता, सर्वत्र. थांबा मात्र, जेथे विचाराचे खतपाणी मूळ धरेल अशाच ठिकाणी. आपण शोधायची असतात अशी माणसे. निस्वार्थीपणे. झळझळत्या ओढयातून, ओंजळ भरून घेण्यासाठी. मनाची तहान ओढा आटवण्याचा प्रयत्न करून भागत नाही. मनाला सवय लागते ओंजळी च्या आधारानं नेमकं ते सत्व शोषून घेण्याची. समान वृत्ती नसेल तर तेथे विचारांची जोड, वीण कदाचित पडू शकत नाही.
जेथे ती वीण पडते तेथे मुखवट्या विना संवाद, खरी अंतरंग उलगडतात, तेथेच प्रयत्नांना सीमा नसतात, अथक प्रेम दिसते, हक्क गाजविला जातो, रागही निर्लोभपणे व्यक्त होतो. पर्वा नसते त्याना लोक काय विचार करतील याचा. त्यांना ठाऊक असते ते फक्त निर्मळ प्रगतीचा, सत्याचा, माणूस घडावा असा मार्ग जगण्याचे पैलू स्वतःच्या जीवातूनच दर्शवीत असतात. अफाट सेवा असते त्या मागे, अथक कार्य आणि महत्वाचे म्हणजे निस्वार्थ भाव.
अशे लोक आधार देत नाहीत ठरतात. आपल्याच मनात. अव्यक्त जाणिवेतून कळतात आपल्याला काय भरभरून फक्त देत होते ते. नकळत आयुष्यचे मार्ग सोपे करत असतात ते. अनामीकपणे आधारस्थम्बच बनून राहतात आपल्या जीवनात. फक्त डोळे मिटून आपल्या जीवनाकडे सजगपणे बघितलं की आपण इथवर पोहोचलो कसे आणि का याची जाणीव झिरपू लागते. अशी ओल दिसत नसते ती आतून भिनलेली असते. अनामिक अस्तिव असत अशा आधारस्थमबाच. जेथे वीण, तेथेच ओल, तेथेच जाणीव. अस्तिव मात्र खोलवर, सबळ करणारे आपल्याला उभारणारे.
असे अस्तिव असतंच मुळी चिरातन. कष्टाळू, मायाळू, अधीर, बघ्याची भमिका धुडकवणारे, स्वार्थने खट्टू होणारे, निखळ पाण्याची पारदर्शकता मागणार, निस्वार्थ, प्रगतशील, भरीव काम करून बाजूला राहणार.
असं अस्तिव नाकारू आपण पण ते आपल्यात ते भिनलेलं असत. पर्याय नाही त्याचा. प्रचीती येणारच.
पावलोपावली! नेहमीच!
Comments
Post a Comment